एमडी ड्रग्जचे भिवंडी कनेक्शन, पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : भिवंडीवरून शहरात एमडी ड्रग्ज येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेने शनिवारी (दि.८) आमखास मैदान परिसरात कारवाई करीत दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून २० ग्रॅम एमडीसह (मॅफेड्रोन) पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शेख आफताब शेख सलीम (वय १९ रा. भोईवाडा, ह.मु. आसेफिया कॉलनी), शेख इराफ शेख अरशाद (रा. अबरार कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत.
आमखास मैदानाजवळ एक तरुण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक रविकांत गच्चे यांना मिळाली. शेख आफताब याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे २० ग्रॅम एमडी (मॅफेड्रोन) सदृश्य पावडर आणि मोबाइल ताब्यात घेण्यात आला. हा माल त्याला शेख इराफ आणि इरफान (रा. भिवंडी) हे पुरवत असल्याचे समोर आले. यानंतर बीड बायपास परिसरातून शेख इराफ याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस निरीक्षक संभाजी पवार, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांच्यासह पथकाने केली.
शेख इराफ ड्रग्जच्या आहारी
शेख इराफ हा नशेच्या आहारी गेलेला आहे. तो इंजेक्शनने ड्रग्ज घेत असल्याचे सूत्रांकडून समजते. त्याला ड्रग्जची एवढी सवय झाली आहे की, त्याशिवाय तो राहू शकत नाही. आता भिवंडीतील आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.